भारतीय विमान आकाशात झेपावण्याचा मार्ग मोकळा :  कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाचं अखेर रजिस्ट्रेशन

मुंबई : वैमानिक अमोल यादव यांनी कांदिवलीतील चारकोप येथील घराच्या गच्चीवर विमान बनवले होते त्या विमानाची नोंदणी करण्यात आली असून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय हवाई वाहतूक महासंचालनालय (डिजीसीए) यांनी यादव यांना  प्रमाणपत्र प्रदान केल आहे. त्यामुळे भारतीय बनावटीचे  विमान आकाशात झेपावण्याचा मार्ग मोकळा झालाय. कॅप्टन यादव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले.
2011 मध्ये अमोल यादव यांनी घराच्या गच्चीवर हे विमान बनविले. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहात हे विमान प्रदर्शित करण्यात आले होते. विमान निर्मिती करण्यासाठी यादव यांच्या विमानाची केंद्र शासनाच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे नोंदणी होणे आवश्यक होते. गेल्या सात वर्षापासून ते नोंदणीसाठी धडपडत होते. मात्र, या प्रक्रियेत अनेक अडथळे येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी जातीने पुढाकार घेतला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते तसेच त्यांच्याशी चर्चाही केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या प्रयत्नांना यश मिळाले असून, डीजीसीएने यादव यांच्या विमानास नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केले आहे. यादव यांनी आज मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. भारतीय बनावटीचे विमान बनविणारी पहिली खासगी कंपनी उभारण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. यादव हे त्यांच्या थ्रस्ट इंडिया कंपनीमार्फत महाराष्ट्रात विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभा करणार आहेत. यादव यांची कल्पकता व भारतीय बनावटीचे विमान बनविण्याचा त्यांचा संकल्प पाहता राज्य सरकारने यादव यांच्या कंपनीस संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले होते. डीजीसीएकडून मंजूरी मिळाल्याने यादव यांचे विमान आकाशात झेपावण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *