अकोला, १ जानेवारी अजित पवार हे आपल्या गटासह राज्याच्या सत्तेत सहभागी झाले. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.एवढच नाही तर त्यांचे बॅनर देखील लागले. तर सातत्याने वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी नववर्षाची रांगोळी काढून अजित पवार मुख्यमंत्री व्हावे हा संकल्प केला आहे.
राज्यात अनेक नेत्यांना मुख्यमंत्री आपण मुख्यमंत्री होणार असल्याचे डोहाळे लागले. अनेकांनी तर आपलाच नेता २०२४ मध्ये मुख्यमंत्री होईल असा विश्वासच २०२३ मध्ये व्यक्त केला आहे. दरम्यान अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर वारंवार भाष्य केलं आहे. अमोल मिटकरी यांनी २०२४ चा संकल्प एवढाच की, राज्याचे मुख्यमंत्री हे अजित पवार व्हावे आणि त्यासाठी राष्ट्रवादी पडेल ते काम करेल असेही म्हटले होते. दरम्यान आता नवीन वर्षाला म्हणजेच २०२४ या वर्षाला सुरुवात झाली आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनी नववर्षाचा संकल्प करीत अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा रांगोळीतून व्यक्त केली आहे.
कलाकार हेमंत उपरीकर यांनी ही रांगोळी मिटकरींच्या निवासस्थानी साकारली आहे. या रांगोळीमध्ये मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, असे लिहिले आहे. तर अजित पवार यांचा फोटो ही साकारला आहे. तर आमदार मिटकरी म्हणाले यावर्षी अजित पवार हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील. अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही यावर्षी कामाला लागू आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री करू तर यावर्षीची आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हेच पूजा करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै २०२३ रोजी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतील ४० हून अधिक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. महाराष्ट्राच्या राजकारण आलेल्या अस्थिरतेमुळे रोज वेगवेगळ्या चर्चा होत असतात. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून सातत्याने ही चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे.