मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. नाशिक, नवी मुंबईनंतर आता अमित ठाकरे यांनी शुक्रवारी कल्याण डेांबिवलीचा दौरा केला. खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे त्यांनी थेट लोकलने प्रवास करीत डोंबिवली गाठली. खड्डयांच्या समस्येवरून त्यांनी टीका केली. जोपर्यंत हे सत्तेत आहेत तो पर्यंत रस्ते सुधारणार नाही असा थेट हल्लाच ठाकरे यांनी नाव न घेता शिवसेनेवर केला. त्यामुळे शिवसेनेला घेरण्यासाठीच अमित ठाकरे हे राजकारण्याच्या आखाडयात उतरल्याचे दिसत आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण -डोंबिवली या शहरांतील खड्डयांचा प्रश्न चांगलाचा गाजत आहे. खड्डयांच्या समस्येवरून थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यावर उतरून अधिका-यांची खरडपट्टी काढली. मात्र खड्डे आणि वाहतूक केांडीमुळे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी थेट लोकलने प्रवास करीत डोंबिवली गाठली. त्यामुळे ठाकरेंचा लोकल प्रवास चर्चेचा विषय ठरला. रस्त्यावर आलेल्या नेत्यांचा तीन दिवसाचा दिखावा आहे अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी कल्याण डोंबिवलीचा दौरा केला. कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर खड्डे असल्याने वा वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी अमित ठाकरे यांनी दादर स्टेशनवरून सकाळी ११ च्या सुमारास लोकल पकडून डेांबिवली गाठली. डोंबिवलीहून गाडीने ते नियोजित स्थळी पोहोचले. खड्ड्याविषयी बोलताना अमित ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अमेय खोपकर, मनसे आमदार राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिकमध्ये करून दाखवलं..
आम्ही ५ वर्षात नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले, तुम्ही 25 वर्षात का नाही बांधू शकत, असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला. राजसाहेबांची इच्छाशक्ती होती, त्यामुळे नाशिकमध्ये चांगले रस्ते झाले. नाशिकमध्ये विकासकामं झाली. यापुढे नाशिकला ४० वर्ष पाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.