पुणे : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण पार पडले. अमित शहा यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच अजित पवार यांचा उल्लेख केला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला, असं मोठं वक्तव्य पुण्याच्या जाहीर कार्यक्रमात केलं आहे.

अमित शहा म्हणाले की, आम्ही कायदा बदलून सहकार मतदारांना अधिकार दिले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत. अशा सूचना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखमंत्र्यांनी आज सकाळच्या बैठकीतच दिलेल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आतापर्यंत 10 हजार कोटींची घोषणा केली मात्र जेवढे पैसे हवेत तेवढे देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली आहे.

सहकार क्षेत्राचा मोठा डेटा तयार होत असल्याचे सांगितले. त्यानुसार तुम्हाला तुमच्या गावात, जिल्ह्यात किंवा राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वरिष्ठांना आपल्या गावाची संपूर्ण माहिती लगेच मिळेल आणि उपाययोजना करण्यात येणार आहे. हा डेटा बनवण्याचं ९५ टक्के काम पूर्ण झालं असल्याचं ते म्हणाले. देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्र एका बाजूला आहे. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे, असं ते म्हणाले.

‘नातेवाईकांना नाही तर कौशल्य असलेल्याला मिळणार नोकरी’

केंद्र सरकारच्या आणि सहकार खात्याचं नेमकं व्हिजन काय आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. त्यात सहकार क्षेत्राच्या अनेक निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्यांचं निराकरण झालं. कोणाच्याही नातेवाईकाला नोकरी मिळणार नाही तर फक्त कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच नोकरी मिळणार असल्याचं ते म्हणाले. को-ऑपरेटिव्ह बॅंकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या पुढे सहकार क्षेत्राशी संबंधित पारदर्शक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!