मुंबई : अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्य दूत गियरमो देवोतो, उप वाणिज्य दूत सिसिलिया रिसोलो, राजकीय विभागाचे प्रमुख रेनाटो मोरालेस, महापालिका उप आयुक्त (परिमंडळ -२) हर्षद काळे, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा उपस्थित होत्या.
अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबी यांनी माझी मुलगी परिचारिका असल्यामुळे मला परिचारिकांची सेवावृत्ती याची चांगली जाणीव आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुरुवातीला परिचारिका म्हणून केलेले काम तसेच कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महापौरांचे कौतुक केले. तसेच महापालिका शाळेतील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे यासाठी ब्यूनास आयर्स व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याबद्दल अर्जेंटिनाचे राजदूत हुगो गोबी यांनी यावेळी स्वारस्य दाखविले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेले काम, महिला सक्षमीकरण तसेच स्टार्टअप उद्योगाला चालना देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध परवानगी मिळविण्यासाठी केलेल्या सुसूत्रीकरणाची व सेवासुविधांची माहिती दिली. महापौरांनी हुगो गोबी व इतर मान्यवरांचे शाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेले “कॉफीटेबल बुक” तसेच पुष्पकुंडी देऊन स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महापौर निवासस्थानाच्या आवारात जायफळ तसेच शोभिवंत झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनची मान्यवरांनी पाहणी करून आनंद व्यक्त केला. तसेच पाबलो राँमिरेज या अर्जेंटिनाच्या चित्रकाराने पेग्विनच्या प्रवेशद्वाराजवळ काढलेल्या चित्राची मान्यवरांनी पाहणी केली. त्यासोबतच दीडशे वर्ष जुन्या नर्सरीला भेट देऊन सेंचुरी पाम वृक्षसंवर्धनाची माहिती घेतली. ऐंशी ते शंभर वर्षातून फक्त एकदा फुल येणाऱ्या सेंचुरी पाम वृक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जतन व संवर्धन करण्याबाबत दिलेल्या सूचनांची माहिती यावेळी मान्यवरांना देण्यात आली. दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष संवर्धन चांगल्या पद्धतीने करण्यात येत असल्याबद्दल मान्यवरांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले तसेच संबंधित अधिकारी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांचे अभिनंदन केले.