मुंबई, दि. ४ः शिविगाळ केल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी निलंबित झालेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी तीन दिवसांपर्यंत कमी करण्याचा ठराव गुरुवारी विधान परिषदेत एकमतांने मंजूर करण्यात आला. दानवे यांनी उपसभापतींना पत्र देऊन दिलगिरी व्यक्त केल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले. दानवेंना यामुळे दिलासा मिळाला असून उद्यापासून सभागृहात ते हजेरी लावणार आहेत. दरम्यान, कमी दिवसात ट्वेण्टी ट्वेण्टी मॅच खेळू असे म्हणत त्यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सूचक इशारा दिले.
भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिविगाळ प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले होते. निलंबनाच्या कालावधीत विधानभवनात त्यांना बंदी घातली होती. यासंदर्भात अंबादास दानवे यांनी ३ जुलै रोजीच्या पत्रात सभागृह प्रति दिलगिरी व्यक्त केली. दानवे यांच्या निवेदनाची दखल घेत, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत निलंबनाचा कालावधी पाच दिवसांऐवजी ३ दिवसांचा करण्याचा प्रस्ताव मांडला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा ठराव सभागृहासमोर ठेवल्यानंतर सर्वांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळे आता अंबादास दानवे यांना दिलासा मिळाला असून ते शुक्रवारी सभागृहात उपस्थित राहणार आहेत.
निलंबन मागे घेतल्याबाबत दानवे यांनी सभापतींचे आभार मानले. उपसभापतींनी फार काही न्याय दिला, असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. आठवड्यातील तीन दिवस संपले असे तरी शेवटचा एक दिवस मिळणार आहे. काही हरकत नाही, टेस्ट मॅच खेळतो, तसाच एका दिवसांच्या टी-२० प्रमाणे मॅच ही खेळू शकतो, असा सूचक संकेत दिले.