मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली .देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, आणि घटनेचं महत्त्व आणि त्याचं पावित्र आबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीसोबतची युतीची घोषणा केली.
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे
- दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन ‘देश प्रथम’ याचा विचार करुन पुढे जाणार आहोत – उद्धव ठाकरे
- देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत – उद्धव ठाकरे
- शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली. आमच्यासोबत ते येतील अशी आशा मी बाळगतो. आमची भांडणं जुनी आहेत, शेतातली नाही – प्रकाश आंबेडकर
- ईडीच्या माध्यमातून देशातील राजकीय नेतृत्त्व संपवण्याचा घाट घातला जात आहे – प्रकाश आंबेडकर
- कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही, नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार आहे, त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली – प्रकाश आंबेडकर
- देशात नवा हुकुमशाह जन्माला येत आहे, त्याला वेळीच आवर घालणं गरजेचं आहे – प्रकाश आंबेडकर
- आता फक्त आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आमच्यासोबत एकत्र येतील – प्रकाश आंबेडकर
- आमचं हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्व, हिंदुत्त्व आमचा श्वास, शिवसेना हा प्रबोधनकारांच्या हिंदुत्त्वावर चालणारा पक्ष – उद्धव ठाकरे
- नया रास्ता नया रिश्ता या तत्वावर आपण पुढे जाऊ – उद्धव ठाकरे
- आम्ही वटपौर्णिमेप्रमाणे व्रत करत होतो, पण त्यांनी बाहेरख्यालीपणा केला म्हणून आम्ही आक्षेप घेतला नाही – उद्धव ठाकरे