पुरोहित संतोष त्रिवेदींनी दिला आंदोलनाचा इशारा
डेहराडून, 17 जून : उत्तराखंडच्या जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहातील भिंतींना बसवलेला पत्रा सोन्याचा नसून पितळेचा आहे असा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे पुरोहित संतोष त्रिवेदी यांनी हा आरोप केला असून आंदोलनाचा इशारा दिलाय.
मुंबईच्या एका व्यापाऱ्यानं केदारनाथ मंदिराला 230 किलो सोने दान केले होते. या सोन्यातून मंदिराच्या गर्भगृहातील भिंती या सोन्याच्या पत्र्याने मढवण्यात आला होता. या सोन्याच्या पत्र्यावरुनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. केदारनाथच्या पुरोहितांनी सोन्याच्या या लेअरवरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. संतोष त्रिवेदी यांनी बीकेटीसीवर गंभीर आरोप केले आहेत. मंदिराच्या गर्भगृहातील पत्रे सोन्याचे नसून पितळेचे आहेत. यात अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्रिवेदींचा आरोप आहे. याप्रकरणातील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन उभारले जाईल असे त्रिवेदींनी सांगितले आहे. पुरोहितांनी गर्भगृहात सोन्याचा लेअर वापरण्यात विरोध केला होता. पण त्यानंतरही इथं सोन्याचा वापर करण्यात आला, असेही त्रिवेदी यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, बद्री-केदार मंदिर समितीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. संतोष त्रिवेदींचे आरोप भ्रम निर्माण करणारे असल्याचे समितीने म्हटले आहे. समितीचे सदस्य आर. सी. तिवारी यांनी सांगितले की, याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामध्ये हे सोन सुमारे एक अब्ज रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये तथ्थे न तपासचा भ्रामक माहिती दिली जात आहे. मंदिराच्या गर्भगृहात लावलेलं सोन हे 23,777,800 ग्रॅम आहे. ज्याची किंमत 14.38 कोटी रुपये आहे. तसेच तांब्याच्या प्लेट्सवर सुवर्णजडीत काम करण्यासाठी 1,001.300 ग्रॅम आहे. याची किंमत 29 लाख रुपये आहे. त्यामुळं अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा खोटा आहे. त्यामुळेच ही भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात समितीकडून कडक कारवाई सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.