मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खेचून, २०२४ मध्ये देश भाजपमुक्त करण्यासाठी देशातील विरोधी पक्ष सरसावले आहेत. त्यासाठी येत्या २३ जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या बैठकीचे आयेाजन केले आहे. त्यामुळे या बैठकीकडे देशाचे लक्ष वेधलय.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मागील महिन्यात नितीशकुमार यांनी मुंबई दौरा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवीत भाजपचा दारूण पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कर्नाटकात तळ ठोकूनही त्यांना यश मिळालं नाही त्यामुळे विरोधी पक्षांचे बळ आणखीनच वाढले आहे. २०२४ ला लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप विरोधात विरोधकांकडून मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.