मुंबई : शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येऊ नये. सर्व चाचण्या शासकीय रुग्णालयांतच कराव्यात, यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची पूर्तता करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.

मुंबईतील कामा, सर जे.जे. रुग्णालय, जी.टी. रूग्णालय, सेंट जॉर्ज रूग्णालयांतील समस्यांबाबत विधिमंडळात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी निधी पुरवठा आणि मनुष्यबळ पूर्ततेसाठी पद निर्मितीसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशित केले. यावेळी हाफकिनचे प्रभारी संचालक अभिमन्यू काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे उपस्थित होत्या.

अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, मुंबईतील या शासकीय रूग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. वैद्यकीय तपासण्यासाठीची आवश्यक यंत्रे उपलब्ध असल्याने रुग्णांना त्यासंदर्भात सेवा देण्यात यावी. तसेच, ज्या वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागते त्यासंदर्भात अहवाल तातडीने सादर करावा. संबंधित यंत्रसामुग्री तसेच मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जे.जे. रुग्णालयातील बंद अवस्थेत असलेल्या दोन्ही कॅथलॅब पुढील सहा आठवड्यांत सुरू कराव्यात. तसेच शवगृहाची डागडुजी करावी. ज्या शवगृहांचे नव्याने बांधकाम सुरू आहे त्या कामांना अंतिम टप्प्यात नेण्याकरिता आवश्यक कार्यवाही अहवाल एका आठवड्यात सादर करावा. सीटी स्कॅन तसेच एमआरआय मशीन खरेदी संदर्भात हाफकिनने (प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था) निधी रुग्णालयाला वर्ग करावा. रुग्णालयाने कमी कालावधीत यंत्र खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी. जेथे शवगृह आहेत, मात्र, कर्मचारी उपलब्ध नाहीत तिथे पदनिर्मितीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. शासकीय रूग्णालयात येणाऱ्या सामान्य रूग्णांना सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता राखावी, शवगृहासंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!