शिधावाटप कार्यालयावर अभासेचा धडक मोर्चा
रेशनिंग समस्यांच्या 19 मागण्या अधिकाऱ्यांसमोर सादर
घाटकोपर ( निलेश मोरे ) नागरिकांच्या रेशनिंगच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अखिल भारतीय सेनेचे विभाग प्रमुख जयवंत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पंतनगर येथील 34 ई शिधावाटप कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला . पक्षाच्या सरचिटणीस आशा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात सामान्य महिलांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . मोर्चात महिलांनी खाली रॉकेलचे डब्बे आणि नासके गहू आणून शिधावाटप कार्यालयासमोर घोषणाबाजी केली . यावेळी मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर 19 अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. रेशनिंग कार्ड असूनही धान्य न मिळणे , रेशनकार्डवर नाव वाढवून मिळणे , पुरावे असून देखील रेशनकार्ड बनवण्यास अडचण , रेशनकार्डवर मिळणारे गहू , तांदूळ खूपच निकृष्ट दर्जाचे या आणि अशा अनेक समस्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला .