मुंबई, दि २७ जानेवारी : इंग्रजी वाचक वर्ग मोठा आहे त्यामुळे ही पुस्तके लाखांनी खपतात. मराठी पुस्तकांच्या आवृत्या हजार पंधराशे प्रतींच्या असतात. त्यामुळे ती जास्त खपत नाहीत, शिवाय मराठी पुस्तके विकत मिळतील अशी दुकाने कोठे आहेत, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी आज व्यक्त केली.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षा निमित्त विदर्भ साहित्य संघ आयोजित ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. ३, ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्धा येथे भरत आहे. त्यानिमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघात प्रा. उषा तांबे यांचा वार्तालाप आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तर अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी प्रा. उषा तांबे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले.
प्रा. तांबे म्हणाल्या की, आजची तरुण पिढी साहित्याकडे कमी आणि तंत्रज्ञानाकडे अधिक वळते आहे. म्हणूनच या संमेलनात ‘वाचन पर्यायांच्या पसार्यात गोंधळलेले वाचक’ हा परिसंवाद ठेवण्यात आला आहे. चंद्रपूर येथे पुस्तक प्रदर्शन भरवले असता त्यात ‘श्यामची आई’ या पुस्तकाची सर्वाधिक विक्री झाली. यावरून अजूनही लोकांना त्या पुस्तकाचे आकर्षण आहे, हे दिसून आले. लहान गावात काय तर मुंबईत देखील मराठी पुस्तक विकत मिळतील अशी दुकाने कुठे आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
रहस्यकथा व गुढकथा आत्तापर्यंत साहित्य संमेलनात उपेक्षित का राहिल्या? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘रहस्यकथांना व गुढकथांना संमेलनात फारसं स्थान दिले नाही हे खरे आहे.’ रत्नाकर मतकरी सारखा एवढा मोठा गुढ कथा लेखक मराठीत होऊन गेला. मतकरींना अनेकदा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विनंती करण्यात आली. त्यांनी ती नाकारली. त्यांचं मोठेपण मान्य केले पाहिजे. यापुढे रहस्यकथा आणि गुढकथांना साहित्य संमेलनात मानाचे स्थान देण्याबाबत नक्कीच विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.
तीन दिवसाचे साहित्य संमेलन युट्युबवर आणि फेसबुकवर लाईव्ह प्रसारित केल्यास ते खुप लोकांपर्यंत जाईल, ही सूचना चांगली असून त्याबाबत नक्कीच विचार केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
साहित्य संमेलनाला पूर्वी रुपये ५० लाखांचे अनुदान जाहीर झाले होते. मात्र खर्चाचा पसारा अधिक असल्याने यंदाच्या वर्षापासून राज्य सरकारने २ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगून त्यांनी तीन दिवसांच्या संमेलनात संपन्न होणार असलेल्या कार्यक्रमांची आणि परिसंवादांची सविस्तर माहिती दिली. पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर यांनी आभार मानले.