मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये पवारांना धक्का बसला आहे. यावेळी उध्दव ठाकरे यांनी बोलताना भाजपवर टीका केली. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे राजकीय इव्हेंट करू नका, अशा शब्दांत भाजपला ठणकावले.
ठाकरे म्हणाले की, लोकसभेचे पडघम वाजू लागले असून ३० एप्रिलच्या आत लोकसभेच्या निवडणुका होतील, अशी चर्चा आहे. ३० एप्रिलपर्यंत निकाल लागला तर तुमचे काहीतरी ठीक होईल, असे कुणीतरी त्यांना सांगितल्याचा टोला भाजपला लगावला. तसेच जागा वाटपाबाबत जास्त विचार करण्याची गरज नाही. ते सुरळीत होईल, राष्ट्रवादीसह घटक पक्षांसोबत व्यवस्थित बोलणे सुरू आहे. दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी आमची चर्चा झाली. पुढील काही दिवसात दिल्लीत पुन्हा बैठक होईल, यात व्यवस्थित जागा वाटप होईल, असे ठाकरे म्हणाले. तसेच वंचितबरोबर सुद्धा आमची बोलणी सुरु आहे. येत्या दोन दिवसात संजय राऊत, शिवसेना (ठाकरे) नेते आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बोलणी होईल. त्यानंतर सर्वांची एकत्रित बैठक होणार असल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले.
राम मंदिराचा राजकीय इव्हेंट करू नका
ठाकरेंना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्यावरून आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. ठाकरेंनी यावर भूमिका मांडली. अयोध्येत राम मंदिर होणे आनंदाची बाब आहे. शिवसेनेने मंदिरासाठी मोठा लढा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केल्याने हिसकावून घेतला होता. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला आहे. रक्त सांडले आहे. त्यामुळे कोणी का करत असले तरी राम मंदिर होत असल्याचा मला आंनद आहे. मात्र राम मंदिर लोकापर्ण सोहळ्याचा कोणी राजकीय इव्हेंट करू नका, अशा शब्दांत भाजपला खडसावले. राम मंदिर नसताना ही अयोध्देत गेलो होता. मनात येईल त्यावेळी अयोध्देला जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
फडणवीसांचे ढोंग उघड
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बाबरी पडली तेव्हा शिवसैनिक नव्हते, या विधानाचा ठाकरेंनी समाचार घेतला. ते चढले असतील आणि त्यांच्या वजनाने ढाचा पडला असेल, असा टोला लगावला. शिवसेनाप्रमुख, शिवसेनेच्या योगदानाबद्दल फडणवीसांची मानसिकता कशी आहे, हे त्यांच्या विधानातून समोर आला असून त्यांचा ढोंगीपणा त्यांनी स्वतःच उघडा पाडल्याचे ठाकरे म्हणाले.