मुंबई :- महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानानं चांगलं जीवन जगता यावं, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचारांची सोय व्हावी, लोककलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनातील चर्चेवेळी सरकारकडे तमाशासह सर्व लोककलावंतांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती आहे. राज्यातील मागास, अतिमागास समाजातील कलावंतांच्या पिढ्यांनी त्यांच्या त्याग, समर्पणातून ही कला जिवंत ठेवली, वाढवली, समृद्ध केली. तमाशाकलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून दिली. या तमाशा कलावंतांसह राज्यातील समस्त लोककलावंतांच्या मान-सन्मानाकडे, हक्कांकडे, विकासाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे असे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
तमाशा कलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचं मोठे योगदान आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. तमाशाकलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईंचे अखेरचे दिवस हालाखीत गेले. बहुतांश लोककलावंतांच्या वाट्याला हेच दु:ख येते, त्यांच्या आयुष्याचा शेवट हलाखीत जातो. हे टाळण्यासाठी लोककलावंतांसाठी वृध्दापकाळात राहण्याची, जेवण्याची, औषधांची व्यवस्था केली पाहिजे. त्यांच्यासाठी वृध्दाश्रम, अल्प व्याजदरात कर्ज, मोफत आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणाची सोय असली पाहिजे. शासनाच्या विकासयोजनांचा लाभ कलावंतांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे. राज्यातील लोककलावंतांकडूनही सातत्याने ही मागणी होत आहे. राज्य शासनाने नुकत्याच घोषित केलेल्या सात महामंडळांबरोबर या महामंडळाचीही घोषणा होईल, ही अपेक्षा होती. परंतु, तसं न घडल्यानं, राज्यातील लाखो लोककलावंतांचा अपेक्षाभंग झाला आहे.त्यामुळे तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीने घ्या अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी केली आहे.
००००००००००००