मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस चा वर्धापनदिन सोहळ्यात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी द्या. आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार भर कार्यक्रमात म्हणाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार म्हणाले की, मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. नेतेमंडळींनी देखील सांगितलं त्यामुळे त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. पक्षातील कोणतेही पद द्या, असे म्हणत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर दावा केला आहे का ? असा सवालही उपस्थित झाला आहे.
यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले. “आपण आपल्या एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर निवडून येऊ शकलेला नाहीय. यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलो आहोत. आपण विदर्भामध्ये कमी पडतो. आपण मुंबईत कमी पडतो. मुंबईत आजदेखील काय अवस्था आहे? आपण 25 वर्षे पूर्ण करुन 26 व्या वर्षात पदार्पण केलंय. पण अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीय. आपल्याला दिल्लीला कुणाला विचारायला जायचंय?”, असा सवाल त्यांनी केला.