मुंबई : एकिकडे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, दुसरीकडे बंडखोर अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदारांनी दुस-यांदा शरद पवार यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या भेटीचे तर्क- वितर्क लढवले जात आहेत. मात्र शरद पवार हे आमचे नेते आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्याचे अजित पवार गटाकडून सांगितलं जातयं. त्यामुळे अजित पवार गटाला नेमकं कोणते आशीर्वाद हवयं याविषयी चर्चा रंगली असून, या भेटीतून अजित पवार गटाकडून आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही बोललं जातय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार गट विरूध्द शरद पवार असा संघर्ष निर्माण झाला आहे. मात्र अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी काल (रविवार १६ जूलै ) शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (सोमवार १७ जूलै) पुन्हा एकदा अजित पवार गटाचे आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले. त्यामुळे पून्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. शरद पवारांची भेट झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मिडीयाशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करत असलेले सर्व मंत्री, आमदार शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला आलो होतो. रविवार असल्याने काल बहुतांशी आमदार आपआपल्या मतदार संघात होते, आज विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याने आमदार मुंबईत हजर होते, त्यामुळे मंत्री ज्येष्ठ नेत्यांसह आमदार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेा होतो. पक्ष एकसंघ राहावा त्यादृष्टीने पवारसाहेबांनी विचार करावा अशी विनंती काल त्यांना केली होती आजही तीच विनंती करण्यात आली. पवारसाहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं असं पटेल म्हणाले. दरम्यान कालच्या भेटीत शरद पवार यांनी भाजपबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केलय. आजही शरद पवार यांची भूमिका कायम असल्याचे समजतय.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्ष आणि चिन्हावर दावा करीत बहुतांश आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात होता. तसेच सभा घेत शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करीत कधी तरी थांबणार आहात की नाही अशी टीका केली होती. या टीकेला शरद पवारांना उत्तर देणं टाळलं होतं. तर पक्ष आणि पक्ष चिन्ह गेलं तरी न्यायालयीन लढाई न लढता लोकांमध्ये आम्ही जाऊ असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. कराडला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात मेळावा घेत रणशिंग फुंकले होते. त्यानंतर नाशिक येवला येथे छगन भुजबळांच्या मतदार संघात त्यांची जोरदार सभा झाली. शरद पवारांना लोकांचा मोठया प्रमाणात पाठींबा मिळत आहे. उध्दव ठाकरे गटाप्रमाणे सहानुभुतेच्या लाटेचा शरद पवार गटाला नक्की पाठींबा मिळू शकतो असे दिसून येत आहे. मात्र आमचे मतभेद असले तरी मनभेद नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत आहे. ज्याचा फायदा सहानुभुतीची लाट थोपवण्यासाठी होऊ शकतो असेही बोललं जातयं.
९ आमदाराचा अपात्रतेचा मुद्दा
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाचा शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने कायदेशीर पावलं उचलत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या ९ आमदारांना अपात्र करण्याची याचिका केली होती. त्यामुळे या ९ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. मात्र ही कारवाई टाळावी यासाठी शरद पवारांना गळ घातली जात असावी, असाही अंदाज आहे.
संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेल्यानंतर काही आमदारांनी थेट अजित पवारांना पाठिंबा दिला. तर काही आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र असे काही आमदार होते की त्यांनी भूमिका स्पष्ट केली नव्हती. किंवा ज्यांनी भूमिका स्पष्ट केली ते देखील अजून तळ्यात मळ्यात आहेत. शरद पवार यांच्या भेटीतून एक प्रकारे संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे. जेणेकरुन ज्या आमदारांना निर्णय घेणे कठीण जात आहे, त्यांना निर्णय घेणे सोपं जाईल, अशी खेळीही अजित पवार गटाकडून खेळली जात आहे, असं बोललं जात आहे.