मनोज मेहता
डोंबिवली : आजी-आजोबा म्हणजे प्रत्येक लहानग्याच्या मनातला जिव्हाळ्याचा कोपरा, पण आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काहीसा दुर्लक्षित झालेला! आजी आजोबा सुद्धा आपल्या घरातील एक महत्त्वाचा घटक आहेत, त्यांच्यात सुद्धा टॅलेंट आहे, हे या बालमनावर ठसविण्यासाठी डोंबिवलीतील ‘विद्यानिकेतन’, शाळा, हा ह्रद्य सोहळा आयोजित करते.
साठी नंतरही आपल्याला कोणी ओळख देत आहे, प्रेमादराने बोलावून आजचा दिवस आनंदात साजरा करत आहे, ही भावना आणि समाधान, आजी-आजोबांपर्यंत पोचवायचं , या ध्येयाने प्रेरित होऊन “विद्यानिकेतन” शाळा दरवर्षी हे संमेलन भरवत आहे.आणि तेही सलग २७ वर्षे, सातत्याने !
संमेलन म्हणजे चर्चा, गोंधळ, आणि अध्यक्ष कोण ? म्हणून अनेकांची प्रतिष्ठा पणाला! हे काहीही न करता, हे ” आजी-आजोबा संमेलन ” दरवर्षी भरवले जाते असे, संस्थापक विवेक पंडित सरांनी सांगितले.
महाराष्ट्र -आणि इतरही राज्यांच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या, सर्व आजी-आजोबांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन आणि मुलांच्या लेझीम पथकाच्या झंजावातात व तुतारी वाजवून केले जाते. गुलाबी थंडीत शाल घेऊन शाळा पाहणे, शिवाजी महाराजांना कुर्निसात करून, नातवंडांचे कलागुण पाहून, शाळेतील कला शिक्षकांनी केलेली अनोखी कल्पकता पाहून, त्याच्या बरोबर सेल्फी काढून स्थानापन्न व्हायचं ! घरी सहजी न मिळणारं पक्वान्न अचानक हातात , म्हणजे कांद्याची गरमागरम भजी व वाफाळलेला चहा! आनंदाने त्याचा आस्वाद घेता घेता, नातवंडांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यांच्या काळातील नाट्यपदे आणि विद्यार्थ्यांनी केलेलं खुमासदार निवेदन ऐकता ऐकता ही मंडळी देहभान विसरतात.
कोकिळ-स्वराने आलेली मधुर सुंदर गाणी-लावणी, तीही शाळेतील विद्यार्थ्यांच्या /नातवंडांच्या आवाजात, शिक्षकांच्या शिट्या त्यावर आजी-आजोबांनी ताल धरत केलेले नृत्य, डोळ्यांचे पारणे फेडतं. नंतर आजी-आजोबांचे भन्नाट खेळ, आजींची धमाल उखाणे स्पर्धा, शाळेतील शिक्षिका, तमाम हौशी आजींना मेंदी काढून देतात. दरवर्षी त्यांच्या काळातील, एका सेलिब्रेटीला बोलावून अनोखे मनोरंजन केले जाते. एकदा तर दाजीशास्त्री पणशीकर स्वतः आजोबा म्हणून आले होते! त्यांनी स्टेजवर येऊन ‘ धंदा न झालेली शाळा ‘ असे गौरवोद्गार काढले , आणि पंडित सरांना आपले स्वतःचे उपरणे देऊन उचित सन्मान केला.
शिक्षकांची आखीव साखळी करून प्रत्येकाला हातात जेवणाचे ताट दिले जाते, त्यावर ताव मारून, आपल्या घराच्या जवळील बसथांब्यापर्यंत विद्यानिकेतनच्या बसने सोडल्यावर, पुढच्या वर्षी कधी? असा विचार करत, पंडित सरांना व शाळेतील सगळ्यांनाच समाधानाने आशीर्वाद देऊन, तमाम आजी आजोबा खूष झाले नाही, तरच नवल !
आतापर्यंत विजया जोगळेकर धुमाळे व विनय धुमाळे, श्रीधर फडके, शरद पोंक्षे, अमर ओक, अशोक पत्की, सुधीर गाडगीळ प्रमुख अतिथी म्हणून आले होते. यावर्षी येत्या २३ डिसेंबरला ऋषिकेश जोशी हे खास आकर्षण असणार आहे.