मुंबई : मुंबईत पवई येथे २४ वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओग्रे हिचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम अटवाल (वय ३५) याने पोलीस कोठडीत आत्महत्या केली. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यानं स्वतःच्या पँटच्या साहाय्यानं गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. विक्रम अटवाल यांच्या आत्महत्येमुळं रुपल ओग्रे हिच्या खुनाचं गूढ वाढलं आहे. .

अंधेरी पूर्वेच्या मरोळ परिसरातील एनजी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत आरोपी अटवाल हा हाऊस कीपिंगची कामं करायचा. मृत एअर होस्टेस रुपल हिच्या घरी देखील तो काम करायचा. मात्र, काम करत असताना रुपल ओग्रे हिच्यासोबत तिचा सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून वाद होत असे. याच रागातून त्यानं रुपलचा खून केला असावा, असं बोललं जात आहे. खुनानंतर रक्तानं माखलेले स्वत:चे कपडे आणि खून करण्यासाठी वापरलेला चाकू त्यानं सोसायटी जवळच्या झुडुपात टाकला होता. त्यानंतर तो तिथून पसार झाला होता.

रुपल ओग्रे ही मूळची छत्तीसगडची होती. ती एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी मुंबईत आली होती. तिच्या चुलत भावाचा मित्र तिला भेटण्यासाठी घरी आला असताना तिचा खून झाल्याचं आढळून आलं होतं. रुपल अर्धवट नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या मानेवर धारदार शस्त्रानं चिरल्याच्या जखमा होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करून विक्रम अटवाल याला अटक केली होती. आज सकाळी त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विक्रम अटवाल हा विवाहित होता. त्याला दोन मुली आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येने या खूनाचं गूढ वाढलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *