मुंबई : नांदेडचे सुपूत्र विवेक चौधरी यांनी भारतीय हवाई दल प्रमुखपदाची सुत्र स्वीकारली. चौधरी हे हवाई दलाचे २७ वे प्रमुख बनले आहेत. मावळते हवाईदलाचे मावळते प्रमुख आरकेएस भदौरिया यांच्याकडून त्यांनी सुत्रे स्वीकारली. हवाई दल प्रमुखपदी मराठी माणूस पोहचल्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
विवेक चौधरी हे हस्तरा गावाचे रहिवाशी असून त्यांचे कुटुंब हे मूळचे शेतकरी होते. हस्तरा येथे विवेक चौधरी यांची शेती आणि घर आहे. विवेक चौधरी यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे अभियंता होते. आई मुख्याध्यापिका होत्या. विवेक चौधरी हे १९८२ मध्ये हवाई दलात दाखल झाले. ते नॅशनल डिफेन्स अकादमीचे विद्यार्थी आहेत. मिग आणि सुखोई ही लढाऊ विमाने उडवण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेची कोणत्याही स्थितीत सुरक्षा केली पाहिजे असा संदेश त्यांनी पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर हवाई दलाच्या सर्व जवानांना दिला.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांचे अभिनंदन केलयं. जगातील बलशाली दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्र सुपुत्र चौधरी यांची नियुक्ती झाल्याने हवाई दलाच्या पंखात आणखी बळ येईल असे मुख्यमंत्रयांनी ट्विट करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.