कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रिया लवकरच : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती

मुरबाड : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामाचा गतीशक्ती योजनेत समावेश झाला असून, या मार्गाचे काम वेगाने केले जाणार आहे. जमीन अधीग्रहणाबाबत रेल्वे बोर्डाने शुक्रवारीच मध्य रेल्वेला पत्र पाठविले असून, मध्य रेल्वेने जिल्हाधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहणाची विनंती केली आहे. त्यानुसार जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांच्या मूळ मुरबाड गावात १७० वर्षाने रेल्वे पोचणार आहे.

सुमारे ७५ वर्षांपासून मागणी होत असलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाला नुकतीच रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज मुरबाड येथे पत्रकार परिषद घेतली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल, मुरबाडकरांनी पंतप्रधानांना धन्यवाद मोदीजी म्हणून पत्र पाठवावीत. तसेच जमीन अधिग्रहणाबाबत सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा समावेश गतीशक्ती’ त केला आहे. या कामावर पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष असेल. त्यामुळे तीन वर्षांत २०२५ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार जमीन अधीग्रहणाबाबत रेल्वे बोर्डाने शुक्रवारीच मध्य रेल्वेला तातडीने पत्र पाठविले होते. त्यानंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना जमीनअधीग्रहणासाठी विनंती केली. त्यानुसार आता जमीन अधीग्रहणासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर आठवडाभरात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष शीतल तोंडलीकर, भाजपाचे मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव आदींची उपस्थिती होती.

दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर मार्गासाठी प्रयत्न

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग मंजुरी मिळाल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर मार्गासाठी प्रयत्न करीत आहोत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुरबाडहून पुण्यापर्यंत मार्गाचा विचार सुरू केला असून, त्याचे लवकरच सर्वेक्षण होईल, असे कपिल पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारच्या हमीशिवाय कोणतेही रेल्वे प्रकल्प हाती न घेण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला होता. मात्र, राज्यातील तत्कालीन सरकारने रेल्वेच्या कुठल्याही प्रकल्पाला पैसे न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्याच दिवशी मुरबाड रेल्वेसाठी ५० टक्के निधीची शाश्वती देणारे पत्र दिले. ते रेल्वेमंत्र्याला दिल्यानंतर मुरबाड रेल्वेला मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचा अहवाल होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच रेल्वे प्रकल्प मार्गी लागला, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गावर हि आठ स्थानकं

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गावर कल्याण, शहाड, आंबिवली, कांबा, आपटी, मामनोली, पोटगाव आणि मुरबाड अशी आठ स्थानके आहेत. या मार्गात दोन मोठे पुल, २२ छोटे पूल, ७ आरओबी, १२ अंडरपास मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमार्ग ओलांडताना ग्रामस्थांना अडचणी येऊ नयेत, यासाठी काळजी घेण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

मल्टी मॉडेल इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारण्याचा रेल्वेचा प्रस्ताव

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाबरोबरच या परिसरात मल्टी मॉडेल इंडस्ट्रियल कॉरिडॉर करण्याची भूमिकाही रेल्वेची आहे. त्यामुळे भिवंडीप्रमाणेच मुरबाडमधून देशभरात माल पाठविता येईल. त्यामुळे मुरबाड एमआयडीसीला चालना मिळणार असून, मुरबाड तालुक्याला वैभव प्राप्त होऊन, हजारो रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!