मुंबई : वरळी येथे पार पडलेल्या ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही पक्षांतर बंदीच्या कायद्याचे विश्लेषण करीत शिंदे गट हा अपात्रच ठरत असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अपमान केला आहे. नार्वेकर यांचा निकाल कसा चुकीचा आहे असे सांगत कायद्यावर बोट ठेवीत लक्ष वेधले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाने थेट जनतेच्या कोर्टात उतरण्याची तयारी केली आहे. आज ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महापत्रकार परिषद पार पडली त्यावेळी कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी कायद्याचे विश्लेषण केले. पक्षांतर कसं करायचं याबद्दलची बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे बघायला पाहिजे. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून बोलायचं नाही. ही जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होत आहे, त्यायाविरोधात जनतेच्या न्यायालयात बोललं पाहिजे असे सरोदे म्हणाले.

सरोदे म्हणाले की, प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा राहिली पाहिजे या उद्देशाने पक्षांततरबंदी कायदा अस्तित्वात आला. राजीव गांधी यांनी हा कायदा अस्तित्वात आणला. या कायद्यात विधिमंडळ पक्ष म्हणजे काय? आणि मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे. विधिमंडळ पक्षाचे आयुष्य ५ वर्षांचे असते. त्यामुळे ती अस्थायी स्वरुपाची व्यवस्था आहे. कायद्यात विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. त्यामुळे मूळ राजकीय पक्ष म्हणजे शिवसेनेला महत्व आहे, जो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे.

दोन तृतीयांश लोक पक्षातून बाहेर गेले, तर त्यांना कायद्याचे संरक्षण मिळू शकते. मात्र त्यासाठी वेगळा गट स्थापन करणे किंवा विलिन होणे ही अट आहे. परंतु एकनाथ शिंदेंबरोबर दोन तृतीयांश लोक गेले नाहीत. सर्वात आधी १६ जण गेले, नंतर काही सुरतला, गुवाहाटीला असे मिळून ४० जण झाले. हे सर्व दोन तृतीयांश संख्येने बाहेर पडले नाहीत, त्यामुळे त्यांना कायद्याचे कोणतेही संरक्षण नाही.. असे असीम सरोदे यांनी नमूद केले.

तसेच विधिमंडळ पक्ष व्हिप ठरवू शकत नाही, मूळ राजकीय पक्ष व्हिप ठरवू शकतात. अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षानं नियुक्त केलेलाच व्हिप मान्य केला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात नमूद केलं आहे, असेही असिम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी बोलताना असीम सरोदे यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत एक फालतू माणूस अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!