मुंबई, दि. २६ः 
मुंबई, पुणे महानगर पालिकांमधील प्रशासकांच्या बदल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या बदल्यांसाठी सरकार खोक्यांची मागणी करत आहेत, असा खळबळजनक आरोप अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. आज पहिल्याच दिवशी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी विविध मुद्दयांद्वारे राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. ठाकरे म्हणाले की, मुंबई, पुणे महानगरपालिका येथील प्रशासकांच्या बदल्या प्रलंबीत आहेत. गेल्या ४ वर्षे या आयुक्तांच्या बदल्या केलेल्या नाहीत. सरकारमधील काही मंत्री बदलीसाठी आयुक्तांकडे खोक्यांची (पैशांची) मागणी करत आहेत. ठराविक रकमेची मागणी करत, आयुक्तांना बदलीची हमी दिली जात आहे, गंभीर आरोप ठाकरे यांनी केला. महानगर पालिकेतील सर्व प्रशासकांची बदली ताबडतोब व्हावी, असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिला आहे. सरकार मात्र खोक्यांची मागणीवर अडून बसल्याने बदल्या केल्या जात नाहीत असे ठाकरे म्हणाले.

 जनरल डायर कोण ? 
मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार होते. परंतु, जालन्यात आंदोलकांवर लाठीमार झाला. अमानुष मारहाण झाली. डोकी फोडली. यामागील जनरल डायर कोण मुख्यमंत्री की दोन उपमुख्यमंत्री याचा शोध लागलेला नाही, असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित करत सरकारवर तोफ डागली. सध्या लोकप्रतिनिधी  जातीयवादी टीका करण्यात व्यस्त आहेत. उपकाराची भाषा बोलतात. ही बाब खेदजनक आहे. कोणत्याही समाजाचा अपमान किंवा त्यांना अपशब्द वापरण्याची कोणतीही गरज नाही, असे ठाकरेंनी ठणकावले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *