मुंबई : मुंबईकरांच्या समस्या, टोलनाके आणि खड्डे यासह अनेक मुद्द्यांवरुन ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सराकराला धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत सराकरवर जोरदार निशाणा साधला. ‘सरकारकडून मुंबईकरांची लूट सुरु आहे असे म्हणत हिंमत असेल तर टोलनाके बंद करा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिले आहे. तर आम्ही यावर आंदोलन करणार नाही. मी जनतेला आश्वसित करतो की, आमचं सरकार लवकरच येणार आहे. आमचं सरकार आल्यानंतर तातडीने दोन्ही रस्त्यांवरील टोलनाके बंद करु असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.
आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ‘मुंबईचे इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हे दोन्ही एमएमआरडीएने बीएमसीकडे हस्तांतरीत केले आहेत. या प्रमुख दोन रस्त्यांची डागडुज्जी रंगरंगोटी वीजचे दिवे दुरूस्ती देखभाल जे काही असेल ते मुंबई महापालकेकडून होणार आहे. मुंबईकरांच्या खिशातून, मुंबईकरांच्या करातून या दोन प्रमुख रस्त्यांचे मेनटेनन्स होत असेल तर टोलनाक्याचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे ? तसेच होर्डिंगचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.
‘मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती बिकट आहे. मुंबईकरांकडून दुप्पट कर आकारला जात आहे. मुंबईला पिळून काढलं जातंय. देशात सगळयात अधिक कर मुंबईकर देत असतो. मुंबई- गोवा आणि मुंबई-नाशिक हायवेवर देखील तिच परिस्थिती आहे. या दोन्ही रस्त्यांसाठी आम्ही पैसे भरत आहोत. या सरकारने मुंबई- गोवा हायवे आणि मुंबई-नाशिक हायवेचे काम पूर्ण करु शकले नाहीत. त्यावर देखील खड्डे पडले आहेत.
‘BEST चे देखील हाल झाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष देणं गरजेचं होतं. यावर बैठक घेऊन चर्चा करणं गरजेचं होतं. पण शिंदेंच्या दिल्लीवाऱ्यांमुळे राज्यातील प्रश्न वाऱ्यावर आहेत. दोन महत्वाच्या मागण्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसाठी आम्ही जो कर भरतोय हे मान्य असेल तर टोलनाका त्वरीत बंद करावा. घटनाबाह्य सराकरशी बोलून त्यांनी टोलनाका बंद करावा. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री यांना राजकारणासाठी वेळ आहे मग बेस्टसाठी का नाही ?, मुंबई -गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी का नाही?, असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी या सरकारची डेडलाईन जवळ आली आहे असे म्हंटले.