आदित्य ठाकरेंनी घेतली बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट

पाटणा : गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी बदलत असतानाच शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बुधवारी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. ये दोस्ती आगे चलती रहेगी. संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती असं आदित्य ठाकरे म्हणाले. राजकीय चर्चा झाली नसल्याचे आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी या भेटीने भविष्यातील राजकीय घडामोडी बदलत असल्याचेच दिसून येत आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तेजस्वी यांना भेट दिली. आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटलं की ही राजकीय भेट नाही, प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे असंही त्यांनी सांगितलं. पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण चर्चा

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. नितीश कुमार वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण यावरही चर्चा झाली, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी नितीश कुमार यांचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!