कल्याण डोंबिवली पाणी प्रश्नाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेसह अधिकाऱ्यांची उद्या संयुक्त पाहणी

ठाणे,दि.13 : ठाणे महापालिका हद्दीतील दिवा भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उद्यापासून अतिरिक्त सहा एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागाने आज त्यावर तत्काळ कार्यवाही केली. त्यामुळे उद्यापासून दिवा भागासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कल्याण डोंबिवली आणि २७ गावांच्या पाणी प्रश्नाबाबत उद्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र, तसेच ठाणे महापालिकेच्या दिवा भागातील पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यास मंत्री शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी झालेल्या बैठकीस खासदार डॉ. शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांचे नगरसेवक,अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

दिवा भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता १० एमएलडी पाणी वाढवून मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार साडे तीन एमएलडी पाणी उपलब्ध झाले असून एमआयडीसीने उर्वरित साडे सहा एमएलडी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. त्यानुसार ठाणे महापालिकेने अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले. पालकमंत्री शिंदे यांनी अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. त्यावर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आज पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आल्याचे या बैठकीत सांगितले.

कल्याण डोंबिवली सह २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी ठाणे, कल्याण डोंबविली महापालिकेचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी उद्या मंगळवारी संयुक्त पाहणी करून अतिरिक्त पाणी पुरवठ्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी दिले.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!