मुंबई दि. ३ जुलै -राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या ९ आमदारांच्या अपात्रतेची याचिका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे.  ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असा इशाराही जयंत पाटील  यांनी दिला आहे. त्यामुळे आता ९ आमदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे. 

 माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की,  येत्या ५ जुलै रोजी पवारसाहेबांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवारसाहेबांसोबत असणारा, पवारसाहेबांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे स्पष्ट केले. 

आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले. ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *