डोंबिवली : पूर्व भागातील नांदिवली टेकडी परिसरात चालकाने निष्काळजीपणाने भरधाव वेगात कार चालवून एका पादचारी महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेच्या डोक्यासह छातीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. शु्क्रवारी रात्री आठ वाजता नांदिवली टेकडीवरील भवानी स्वीट्स दुकानासमोरील रस्त्यावर हा अपघात घडला.
पूनम जगन्नाथ दुबळे (53) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला त्याच भागातील अंबरतीर्थ सोसायटीमध्ये राहत होती. या संदर्भात बेजबाबदार कारचा चालक महेंद्र सदाशिव चव्हाण (33) याच्या विरुध्द पूनम यांचा नातेवाईक सचीन चंद्रकांत मेंगे (35) यांंनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पूनम दुबळे या शुक्रवारी रात्री बाजारात खरेदी करून नांदिवली टेकडी भागातून घरी चालल्या होत्या. भवानी स्वीट्स दुकाना समोरून रस्त्याच्याकडेने जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून टाटा कंपनीची टिगोर कार भरधाव वेगात आली. कार अंगावर येताच पूनम यांनी बाजूला होण्याचा प्रयत्न केला. परंतु भरधाव वेगात असलेल्या कारची जोरदार धडक बसल्याने त्या जागीच कोसळल्या. कार रस्त्याच्या कडेला धडकातच मोठ्याने आवाज झाला. इतर पादचारी सैरावैरा पळाले. कारच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याचे पाहून पादचाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कारचा चालक महेंद्र चव्हाण याच्या निष्काळजीपणामुळे पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.