ठाणे, दि. 1 : जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे. तसेच अपघात मुक्त ठाणे जिल्हा हे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आज येथे केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वाभंर शिंदे, श्रीमती मालिनी पाटील आदी उपस्थित होते. तर आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता परदेशी आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

सामान्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, अपघाती मृत्युदर कमी करणे आदी विषयांवर चर्चा करून यासंबंधी काय नाविन्यपूर्ण उपाय आपण करू शकतो याबाबत मार्गदर्शन करून पाटील म्हणाले की, गेल्या काही काळात रस्ते अपघात कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे ठाणे जिल्ह्यात अपघात कमी होत आहेत. मात्र, अपघात मुक्त ठाणे जिल्हा करण्यासाठी अधिक प्रयत्न करून जिल्ह्याचे नावलौकिक वाढविण्यात यावे. ठराविक महिन्यात व ठरविक वेळतच जास्त अपघात का होतात याचे विश्लेषण करावे. तसेच नागरिकांमध्ये नियम पाळण्यासंदर्भात मानसिकता तयार करण्याची आवश्यक आहे. ब्लॅक स्पॉट कमी करून ठाणे जिल्हा झिरो टॉलरन्स रण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत.

जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग हे ठाणे जिल्ह्यातून जातात. त्यादृष्टिने हा जिल्हा महत्त्वपूर्ण आहे. रस्ते सुरक्षा विषयक कामांमध्ये जिल्ह्याने गेल्या वर्षी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील काळातही यापेक्षा अधिक चांगले काम केले जावे. रस्ते सुरक्षासंबंधी ज्या उपाययोजना राबविल्या जातात, त्याची योग्य प्रकारे अमंलबजावणी व्हावी. रस्ते अपघात कमी करण्यासाठी संबंधित विभागानी एकत्र येऊन रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी उपाय योजावेत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.

यावेळी आमदार गायकवाड व अयलानी यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने सूचना केल्या. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात रेजिलंट इंडिया या संस्थेने यावेळी सादरीकरण केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *