१ जानेवारीपासून मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार होणार
नवी दिल्ली, : कधी चालू तर कधी बंद असणारे फॅन, घामाजलेले प्रवासी यातून आता प्रवाश्याची सुटका होणार आहे. १ जानेवारीपासून मुंबईत एसी लोकल धावणार आहेत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे मुंबईकरांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे.
वातानुकूलित लोकलच्या रूपाने मुंबईकरांना रेल्वे मंत्रालयाच्यावतीने नव्या वर्षाची भेट मिळणार आहे मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्याकरिता रेल्वे मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यानी ही घोषणा केली. ते म्हणाले, मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी वातानुकूलित लोकलची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून पुढील वर्षी १ जानेवारी पासून या उपनगरात वातानुकूलित लोकल सुरु करण्यात येणार आहे.
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे व फुट ओवर ब्रिज
मुंबईतील एलफिन्सटन रेल्वे स्थानकावर २९ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांचा तज्ज्ञ समितीकडून अभ्यास करण्यात आला. या समितीने रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल सोपविला आहे. समितीने अहवालात महत्वाच्या सूचना केल्या असून, यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक फुट ओवर ब्रिज बांधणे, अस्तित्वात असलेल्या फुट ओवर ब्रिजचा विस्तार करणे, फुट ओवर ब्रिज पुनर्स्थापित करणे, फेरीवाल्यांना फुट ओवर ब्रिज प्रतिबंधित करणे, रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, स्वचलित पाय-या (एस्केलेटर) उभारणे आदी सूचना केल्या आहेत.समितीने केलेल्या या महत्वपूर्ण सूचनांनुसार विभागीय रेल्वेकडून या संदर्भात सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे गोयल यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!