डोंबिवली, २३ फेब्रुवारी : अवघ्या दहाव्या वर्षी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हा ३९ कि.मीचा सागरी पल्ला अवघ्या ८.४० तासांमध्ये पोहणारा डोंबिवलीचा आरव गोळे, हा पराक्रम इतक्या लहान वयात त्याने केला. मंगळवारची मध्यरात्री नंतर दीडच्या सुमारास धरमतरच्या समुद्रात उडी मारलेल्या आरवचे पाय आठ तासांनी साडेनऊच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्याला लागले. गेली सहा महिने घेत असलेल्या परीश्रमांचं चीज झाल्याची भावना त्याचे वडील अद्वैत गोळे यांनी व्यक्त केली. कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व मुंबई परीसरातील विविध सागरी किनाऱ्यांवर रोज सहा सात तास ओपन सी स्विमिंगचा सराव करणाऱ्या आरवनं हा पराक्रम करत डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

तिसऱ्या वर्षी पोहायला शिकलेल्या आरवनं स्विमिंगमधलं व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास पाचव्या वर्षी सुरुवात केली. सातव्या वर्षी विविध ठिकाणच्या पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केलेल्या आरवनं समुद्रामध्ये पोहण्याची तयारी मात्र सहा महिन्यांपूर्वीपासून सुरू केली.

राजेश गावडे , मितेश पाटोळे आणि किशोर पाटील या अनुभवी प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण आणि डोंबिवली जिमखान्याच्या दिलीप भोईर यांच्या मार्गदर्शनाचा धरमतर गेटवेचं शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रचंड फायदा झालाचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *