भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात, आप चा ऐतिहासीक विजय !
दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष वेधलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे दिल्ली महापालिकेवरील भाजपची (BJP) १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आली आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेनंतर आपने महापालिकेची सत्ताही काबीज करीत भाजपची सफाई केली. दिल्लीत आपचा ऐतिहासीक विजय समजला जात आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली हेाती. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दिल्ली महापालिकेच्या २५० जागांपैकी आम आदमी पक्षाने १३४ जागांवर विजय मिळवला. भाजपला १०४ जागेवर यश मिळालं. काँग्रेसने ९ जागांवर विजय संपादन केला. तर ३ अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. दिल्ली महापालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे. त्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे.
दिल्लीत गेल्या आठ वर्षापासून आप ची सत्ता आहे. मात्र उत्तर दिल्ली महानगरपालिका, दक्षिण दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका अशा तीन महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून भाजप सत्तेवर हेाती. यंदाच्या निवडणुकीत या तीन महानगरपालिकांची एक महापालिका करण्यात आली. मतांची विभागणी होऊ नये यासाठी भाजपने एक महापालिका केल्याचा आरोपही आप ने केला हेाता. त्यामुळे हि निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली हेाती. मात्र दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाच्या हातात महापालिकेची सत्ता दिली आहे.
भाजपचा जोरदार प्रचार, पण अपयश …
दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार केला होता. प्रचारासाठी भाजपने ७ मुख्यमंत्री, १७ कॅबिनेट मंत्री, शंभरच्या आसपास खासदार अशी मोठी फौज उतरवली होती. मात्र महापालिकेची सत्ता राखण्यात भाजपला यश आलं नाही. नवीन पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने सर्वात जुन्या आणि मोठया पक्षाचा पराभव केला आहे. त्यामुळे दिल्ली महापालिकेचा विजय हा आप साठी ऐतिहासीक विजय समजला जात आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, परिवर्तनासाठी जनतेचे आभार …
दिल्ली महापालिकेतील विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी दिल्लीच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. इतक्या मोठ्या आणि दणदणीत विजयासाठी, एवढ्या मोठ्या बदलासाठी, परिवर्तनासाठी मी दिल्लीच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. दिल्लीतील जनतेने १५ वर्षांच्या भ्रष्ट भाजप सरकारला हटवून आपचे सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत दिले आहे, जनतेचे आभार. ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. दिल्लीची साफ सफाई, भ्रष्टाचार हटवणे, उद्यानाची दुरुस्ती अशा अनेक जबाबदाऱ्या दिल्लीच्या जनतेने माझ्यावर सोपवल्या आहेत. तुमचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करेन.
आप चे मुंबईतही जोरदार सेलिब्रेशन …
दिल्ली महापालिका काबीज केल्यानंतर दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले. मुंबईच्या अध्यक्षा प्रिती मेनन यांनी मुंबई कार्यालयाबाहेर कार्यकत्यांसमवेत जल्लोष केला. आम आदमी पक्षाच्या विजय म्हणजे परिवर्तनाचे वातावरण, सर्वसामान्यांच्या विजय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आपच्या कार्यकत्यांनी मुंबईत लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला.
निवडणुकीचा निकाल
आप – १३४
भाजप – १०४
काँग्रेस – ९
अपक्ष – ३