डोंबिवली, दि,१६ : पुणे शहरात कोयता गँग ने दहशत पसरवल्याची घटना घडली असतानाच, आता सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत एका तरुणाने हातात कुऱ्हाड घेऊन वाहनाची तोडफोड करीत दहशत पसरविणाऱ्या निलेश शिंगारे या २६ वर्षीय तरूणाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
शहरात कुऱ्हाड घेऊन वावरणाऱ्या किरण याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून त्यामुळे शहरात मात्र दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक त्यांचा जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वपोनी मोहन खंदारे आणि त्यांच्या पोलीस पथकाने कसोशीने शोध घेवुन आरोपी निलेशला बेड्या ठोकून अटक करत पुढील तपास सुरू केला आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निलेशच्या भावाला दोन ते तीन दिवसांपूर्वी काही कारणाने परिसरातील इतर तरुणांनी मारहाण केली होती. हे समजल्यानंतर निलेश संतापला. भावाचा बदला घेण्यासाठी रात्रीच्या वेळी तो कुऱ्हाड घेऊन बाहेर पडला. काल रात्रीही तो अशाच प्रकारे फिरत होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील जुने डोंबिवली परिसरात दहशत दाखवण्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर उतरला. एवढेच नव्हे तर भररस्त्यात त्याने रिक्षा थांबवून रिक्षा चालकांना मारहाण केली आणि एक रिक्षा तसेच एका बाईकचीही तोडफोड केली. यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि दहशत पसरली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू नगर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
—