अविनाश उबाळे

ठाणे । :  रात्रीचा गडद अंधार…. धो धो पडणारा पाऊस… अशा भर पावसात आम्ही रात्री साडे अकराच्या सुमारास पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी पुलावर उभे होतो. काम सुरू असताना अचानक गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने मी खाली फेकला गेलो, शंभर फुट अंतरावरून मी चिखल झालेल्या मातीच्या ढिगार्‍यात जाऊन पडल्याने सुदैवाने माझा या दुर्घटनेतून जीव वाचला दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो असे बिहार वरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शहापुरात आलेला प्रेम प्रकाश आयोध्या साव हा कामगार सांगत होता.या दुर्घटनेत जखमी अवस्थेत मातीच्या ढिगाऱ्यातून त्याला स्थानिक ग्रामस्थांनी सुरक्षित बाहेर काढले.त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने सध्या शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रेम प्रकाश साव याच्यावर उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सध्या रस्ते विकास महामंडळाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.भर पावसात रात्रीच्या सुमारास कामगार आणि मजुरांचा जीव धोक्यात घालून महामार्गाचे हे काम समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदार,कंपन्यांकडून मनमानीपणे सुरू आहे.काम जलद गतीने होण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास घिसाडघाईत काम उरकण्यात येत आहे. कामगारांच्या सुरक्षेच्या कुठल्याही उपायोजना न करता बिहार येथील मजुरांनकरवी हे जीवघेणे काम करुन घेतले जात आहे.अशाच प्रकारे सोमवारी मध्यरात्री  शहापूर तालुक्यातील सरलांबे जवळील खुटाडी गावाजवळ सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलांच्या कामासाठी गर्डर बसवण्यात येत होते.याच वेळेस काही तांत्रिक चुकांमुळे काम सुरू असताना अचानक गर्डर सहीत मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अशा दुर्घटनेत क्रेन आणि गर्डर खाली दडपून अनेक निष्पाप कामगारांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.याच झालेल्या भीषण अशा दुर्घटनेत पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामात मजुरीचे काम करणाऱ्या व बिहार राज्यातून आलेल्या एका गरीब कुटुंबातील प्रेम प्रकाश अयोध्या साव हा ३५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.

पोटापाण्याच्या शोधात मुंबईत …

पोटापाण्याच्या शोधात तो महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयातील शहापूरात समृद्धी महामार्गाच्या कामावर कामगार म्हणून मजुरीचे काम करतो सोमवारी झालेल्या दुर्घटनेत तो पुलावरून खाली पडला मात्र सुदैवाने खाली साठलेल्या गाळ आणि चिखलात जाऊन तो पडल्याने त्याचा जीव बचावला मातीत रुतून बसलेल्या प्रेम प्रकाशला मदतीसाठी धावलेल्या सरलांबे,व खुटाडी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी मातीच्या ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढले. आणि त्यास प्रशासनाच्या मदतीने तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

प्रेम प्रकाश हा गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शहापुरात आलेला होता.घरी आई निपुरा देवी, लहान भाऊ जयप्रकाश,पत्नी अनिता देवी, मुलगा रोशन आणि आशिष असं त्याचं सारं कुटुंब बिहार राज्यातील जिल्हा जहानाबाद,करवला या छोट्याशा एका खेडेगावात वास्तव्याला आहे. रोजी रोटीसाठी त्याने कुटुंब सोडून मुंबई गाठली व येथील एका कंपनीचे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने तो मजुरीसाठी तेथे काम करू लागला समृद्धी महामार्गाच्या कामातील मजुरीतन मिळणाऱ्या पैशातून त्याच्या गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.आठ तास काम केल्यावर १८ हजार रुपये त्याच्या महिन्याअखेरीला हातात पडतात दरमहा मजुरीतून मिळणारे हे पैसे तो पोस्टातील मनी ऑर्डरने गावी पाठवतो असे प्रेमप्रकाश सांगत होता.

पायाला गंभीर दुखापत

या दुर्घटनेतून माझा जीव जरी वाचला असला तरी मी आता पायाला दुखापत झाल्याने जखमी झालो आहे.आता मी मजुरीचे काम कसे करू माझ्या कुटुंबाला दरमहा मनीऑर्डरने पाठवणारे पैसे कसे पाठवू असे हताशपणे जखमी झालेला प्रेम प्रकाश सांगत होता. प्रेम प्रकाश सारखे असे असंख्य मजूर उत्तर प्रदेश,कर्नाटक,बिहार, काठमांडू, उत्तरखंड राज्यातून महाराष्ट्रात रोजी रोटी साठी आलेले आहेत समृद्धी महामार्गाच्या कामासारख्या असंख्य साईटवर हे हे मजूर जीवघेणे काम करीत आहेत.

कामगार सुरक्षेचे नियम पायदळी

कामगार व मजुरांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कोणत्याही उपाययोजना कंत्राटदार कंपन्यांकडून त्यांना वेळेवर पुरविण्यात येत नाहीत शासनाचे कामगार सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदार,कंपनीच्या अक्षम्य निष्काळजी व बेपर्वाईमुळे ही शहापूरात दुर्दैवी अशी दुर्घटना घडल्याने निष्पाप मजुरांना हकनाक आपला जीव गमवा लागला आहे.तर या घटनेत काही मजुर जखमी झाल्याने त्यांना अपंगत्व आले आहे.यात जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवर राज्य सरकार कडक कारवाई करणार का ? असा सवाल आता राज्य सरकारला विचारला जात असून समृद्धी महामार्ग सारख्या महत्त्वाच्या रस्ता प्रकल्पाचे काम भर पावसात मध्यरात्रीच्या सुमारास घिसाडघाईने करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी आता पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!