डोंबिवली : एकीकडे दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाच दुसरीकडे एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगरमध्ये सर्व्हिस रोडला असलेल्या वंदेमातरम् उद्यानासमोर जंगली चिंचेचे अवाढव्य झाड हॅपीहोम वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वारावर कोसळले. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. झाड कोसळल्याने या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते. अखेर हायड्रा मशीन क्रेन आणून हे झाड अग्निशामक दलाच्या जवानांनी तोडून बाजूला सुरक्षित जागेत आणले. त्यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. कोसळलेल्या झाडामुळे वृद्धाश्रमाच्या कुंपणाचे आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भूखंड क्रमांक माहिती फलकाचे नुकसान झाले आहे. वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आहेत. शनिवारी दिवसभरात एमआयडीसीच्या निवासी विभागातील जवळपास पाच झाडे उन्मळून पडली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.