माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडून पोलखोल
ठाणे, दि. २९ (प्रतिनिधी) : ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागाचे फेरीवाल्यांनी चक्क गोदामात रुपांतर केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी या प्रकाराची पोलखोल केल्यावर रेल्वे प्रशासनाने पंचनामे केले आहेत. या प्रकरणी वाघुले यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल यांच्याकडे तक्रार केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज सहा लाख प्रवाशांची वर्दळ आहे. मात्र, रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून परिसरात फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर फेरीवाल्यांना बसू न देण्याचे आदेश दिले असतानाही, या आदेशाची ठाण्यात पायमल्ली केली जात आहे. रेल्वे प्रशासन व महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानक परिसरात ठाण मांडले आहे. या संदर्भात सातत्याने तक्रारी केल्यानंतरही जुजबी कारवाई केली जात असल्यामुळे फेरीवाल्यांची मुजोरीत वाढ झाली आहे.
रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहाच्या आवारात फेरीवाल्यांकडून माल ठेवला जात असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय वाघुले यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यावर प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागात फेरीवाल्यांनी माल ठेवला असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी स्टेशन मॅनेजर व रेल्वे पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. या ठिकाणी कंत्राटदार असलेल्या बूरा कॉन्ट्रॅक्टस् कंपनीच्या कर्मचाऱ्याकडेही चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून मुख्य कंत्राटदाराची चौकशी केली जाणार आहे.
महापालिकेच्या कारवाईवेळी रेल्वे हद्दीत फेरीवाले येतात. महापालिकेचे वाहन गेल्यानंतर पुन्हा पथारी पसरत असल्याचे सर्रास आढळते. मात्र, आता रेल्वेच्या मालमत्तेचा वापर गोदाम म्हणून करण्यापर्यंत फेरीवाल्यांची मजल गेली आहे. या प्रकारात रेल्वेचे अधिकारी व कंत्राटदाराचा आशीर्वाद असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी रेल्वे मंत्र्याकडे करण्यात आली आहे, असे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी सांगितले.