मुंबई, दि. २६ मार्च : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठी आहे. भाजपाचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव करेल. मागील १० वर्षात भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले त्याचा उगम हा नागपुरच आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असे चित्र सगळीकडे आहे.

नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही. ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला, मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. आज जनतेला गांधी विचाराची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतुक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले. नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत, आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. काँग्रेस पक्षात एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यात आली व नंतर अर्ज दाखल करण्यात आला. विकास ठाकरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिसन ओझा, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!