मुंबई, दि. ४ः राज्यातील शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात शासन सकारात्मक असून कोणावर ही अन्याय करणार नाही. पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी बदल्यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या दरम्यान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सवंर्ग एकमधील शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा उपस्थित केला. मंत्री गिरीश महाजन यांनी यावर उत्तर दिले.
ते म्हणाले की, संवर्ग एक मधील शिक्षक वर्षांनुवर्षे ज्या ठिकाणी पाठवले जाते, तेथेच काम करतात. त्यापैकी अनेकांना आपल्या गावी किंवा घराजवळ पदोन्नती हवी असते. शासनाच्या नियमानुसार सवंर्ग एक मध्ये तीन वर्षांचा कालावधी पूर्ण व्हावा लागता. इतर नियमांची पूर्तता होण आवश्यक असते. आता ही ११ हजार शिक्षकांनी बदल्यांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २५०० ते २६०० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु बिंदु नामावलीची अट आणि त्या श्रेणीतील संबंधित ठिकाणी रिक्त जागा नसल्याने बदली करता आलेली नाही. आताही नियमानुसार तीन वर्षे झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे बदल्या करता आल्या नसल्याची कबूली मंत्री महाजन यांनी दिली. दरम्यान, बदल्यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढणार, असे आश्वासन दिले.
शासन शिक्षकांच्या बाबतीत सकारात्मक आहे. कुणावरही अन्याय करणार नाही, नवीन भरती सुरु असून नव्या शिक्षकांना दुर्गम भागात पाठवून दुर्गम भागातील शिक्षकांना अपेक्षित ठिकाणी बदली देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची अमंलबजावणी करण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.