इमारतीची दुरूस्ती न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा
डोंबिवली : सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीली एक शाळा दृष्टिक्षेपात आली आहे. ही शाळा शहरातील आहे की दुर्गम भागातील, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. डोंबिवलीजवळच्या आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची शाळा आहे. विजयनगरमध्ये असलेल्या लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेची अनेक वर्ष देखभाल-दुरुस्ती न केल्याने शाळेच्या इमारतीला तडे गेले असून भिंतींचे प्लास्टर कोसळत आहे. शाळेतील स्वच्छतागृहाच्या मलवाहिन्या तुंबल्या असल्याने शाळेच्या आवारात दुर्गंधी पसरत असल्याने विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आयरे गाव शाखाप्रमुख राकेश राणे यांनी सांगितले.
येत्या महिनाभराच्या कालावधीत शाळेची देखभाल-दुरुस्ती केडीएमसी प्रशासनाने केली नाहीतर मुले, शिक्षकांच्या जीविताचा विचार करुन पालिकेच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा विभागप्रमुख राहुल भगत यांनी दिला आहे. प्राथमिक शाळेत परिसरातील विद्यार्थी बहुसंख्येने येतात. अनेक वर्ष या शाळेची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे भिंती आणि छताचे प्लास्टर कोसळत आहे. इमारतीच्या खांबांना तडे गेले आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस असेल त्यावेळी जीव मुठीत घेऊन याठिकाणी शिकवावे लागते. शाळेची वेळीच डागडुजी करावी म्हणून बांधकाम विभागासह प्रशासनाधिकाऱ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले. मात्र त्याचीही दखल घेतली जात नाही.
गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहाची मलवाहिनी तुंबली आहे. सांडपाणी बाहेर वाहून जात नसल्याने तुंबलेल्या पाण्यामुळे शाळेच्या आवारात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या डासांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलवाहिन्या स्वच्छ कराव्यात म्हणून वारंवार मागणी केली जात आहे. त्याकडेही लक्ष दिले जात नाही, अशा तक्रारी आहेत. शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण प्रमुख अरविंद बिरमोळे, उपशहर संघटक हरिश्चंद्र पराडकर, विभागप्रमुख राहुल भगत, शाखाप्रमुख राकेश राणे यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर या शाळेची दुरुस्ती करुन घ्यावी, अशी मागणी केली आहे. यावर अधिकाऱ्यांनी शाळेच्या दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. महिनाभराच्या कालावधीत ही कामे पूर्ण केली नाहीत तर मात्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.