ठाणे, 19 फेब्रुवारी : तुम्ही इंटरनेट वापरता का?… हो, मग इंटरनेटवर काय पहाता? गुगल, यूट्यूब.. यूट्यूबर काय पाहता?.. शास्त्रज्ञांची माहिती वाचतो…, कोणते शास्त्रज्ञ? न्यूटन, आईनस्टाईन, गॅलेलिओ या शास्त्रज्ञांची माहिती वाचली.. न्यूटनने ग्रॅव्हीटीचा शोध लावला.. आदींची उत्तरे देत आम्ही चित्रकारांची चित्रे आणि शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या प्रकल्पांची माहिती शोधतो.. सर.. मी बनविलेला प्रकल्प पाहायला तुम्ही आमच्या शाळेत या… असे आमंत्रण ठामपा शाळा क्र. 120 मधील अंशू यादव या आठवीतील विद्यार्थींनीनी आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले अन् एक क्षण संपूर्ण सभागृह भारावून गेले… आयुक्तांनी देखील मला प्रकल्प पाहायला आवडेल असे सांगितले.. असा प्रश्नोत्तरांचा तास महापालिका आयुक्त आणि महापालिका शाळांतील विद्यार्थी यांच्यामध्ये गुरूवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात रंगला.
निमित्त होते डिजिटल शिक्षण कार्यक्रम 2023 या उपक्रमातंर्गत ‘अक्षयपात्र’ या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या टॅबवाटप कार्यक्रमाचे. ठाणे महापालिकेच्या विविध शाळांमधील आठवीतील एकूण 38 विद्यार्थ्यांना आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अनघा कदम, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, अक्षयपात्र संस्थेचे समन्वयक उपेंद्र प्रभू तसेच महापालिका शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्याना टॅबच्या माध्यमातून ‘बायजूस ॲप’ देण्यात आले आहे ही कल्पना चांगली असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करण्यापासून न रोखता मुले काय पाहत आहेत यावर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे, आज इंटरनेटमुळे जग खूप जवळ आले आहे, मुलांनाही नवनवीन गोष्टी आत्मसात करता आल्या पाहिजेत असेही आयुक्त श्री. बांगर यांनी मुलांशी संवाद साधताना नमूद केले. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जगात सुरू असलेल्या महत्वपूर्ण घडामोडींबाबतची माहिती देणे गरजेचे आहे. शाळेच्या सभागृहात एका टॅबद्वारे स्क्रीनच्या माध्यमातून बायजूज ॲपचे डिजीटल शिक्षण देण्याची व्यवस्था करावी, तसेच मुलांना याचा जास्तीत जास्त वापर कसा होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी शिक्षण विभागाला दिल्या
विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना इंटरनेटवर विविध चित्रकारांची चित्रे शोधून ती पाहत असल्याचे उत्तर एका विद्यार्थ्यांने दिले. यावर आयुक्तांनी भिंतीवर चित्र काढायला आवडेल का? असा प्रश्न विचारताच तात्काळ विद्यार्थ्यांना होकार दर्शविला. ज्या विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी द्यावी असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी सांगितले.