मुंबई : अयोध्येत येत्या २२ जानेवारीला रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (ता. २२) राज्यभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचे परिपत्रक शुक्रवारी जारी केले. दरम्यान, केंद्र सरकारने यापूर्वीच अर्धा दिवसाची सुट्टी केली आहे.
अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला लोकार्पण होणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना होईल. देशभरात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. देश-विदेशातील ६ हजाराहून अधिक अतिमहत्वाच्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर केली आहे. केंद्रीय संस्था आणि इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही आता पूर्ण दिवस सुट्टी दिली आहे.
रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांनी या पत्रांची दखल घेत, सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी सणाप्रमाणे हा दिवस साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.