ठाणे : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती कोकण प्रांताच्या वतीने रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी ठाण्यातील हिंदुह्रदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “प्रादेशिक साहित्यातील राष्ट्रीयत्व” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गोळे, उद्घाटक विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष पितांबरी उद्योग समूहाचे रविंद्र प्रभु देसाई असतील. उद्घाटन सोहळ्यात नॅशनल बुक ट्रस्टचे मिलिंद मराठे, ठाणे जनता सहकारी बँकेचे शरद गांगल आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र पाठक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात “प्रादेशिक साहित्यात उमटलेले राष्ट्रीयत्व” या विषयावर मा. पृथ्वीराज तौर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून कोकण प्रांतातून मागवण्यात आलेल्या शोधनिबंधातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या संमेलनात “मला भावलेले शिवराय” हे तरुणांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे.
साहित्य भारती कोकण प्रांताकडून दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांचे वितरणही या संमेलनाच्या समारोप सत्रात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या संमेलनासाठी साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन साहित्य भारती कोकण प्रांताचे अध्यक्ष दुर्गेश सोनार, कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख व मंत्री संजय द्विवेदी यांनी केले आहे.