समाजातील गोर गरीब नागरिकांच्या हितासाठी सामूहिक विवाहाची परंपरा कायम ठेवावी – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
लासलगाव,दि.१९ नोव्हेंबर :– नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिती,मुस्लिम फाऊंडेशन लासलगाव व नाज ए वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. प्रत्येक विवाहित जोडप्याला संसार उपयोगी साहित्यही यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा अतिशय महत्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी. विवाहाच्या खर्चातील बचत होऊन हा निधी नवदाम्पत्याला भावी आयुष्यात वाटचालीसाठी उपयोगी पडेल. तसेच गोर गरीब कुटुंबीयांना या सोहळ्यातून अधिक मदत होते असे भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, फातिमा बी शेख यांचा आदर्श मुलींनी ठेवावा. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सावित्रीबाई फुले यांना साथ देऊन महिलांना शिक्षण दिलं. त्यामुळे मुलींनी चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे असे सांगत समाजातील एकात्मतेाठी तसेच चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी असे सोहळे होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.