कल्याण : कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या महिलेवर चोरट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शाळेतून सुटलेल्या मुलीला आणण्यासाठी निघालेल्या या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या चोरट्याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने वार करून तिला जखमी केले.
प्रिया सावंत असे हल्ल्यातून बचावलेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मंगळवारी सकाळच्या सुमारास तिच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी रस्त्याने जात होती. चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. मात्र या महिलेने त्याला प्रतिकार केला. पकडले जाण्याच्या भीतीमुळे चोराने धारधार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. गळा, हात, पोट, मान आणि पाठीवर वार झाल्याने ही महिला रस्त्यावर कोसळली. हे पाहून चोरट्याने तेथून पळ काढला. रस्त्यावरील पादचाऱ्यांनी उचलून तिला दवाखान्यात नेले. तेथून तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांना गुन्हा नोंदवून हल्लेखोर चोराचा शोध सुरू केला आहे.