नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटूंबियांना ५ लाखाची मदत जाहीर केली मात्र यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारने जाहिर केलेल्या ५ लाखांच्या मदतीवरुन शिंदे-फडणवीसांचे कान टोचले आहेत. माणसाची किंमत ५ लाख होऊ शकत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करते. मृतांना मी श्रद्धांजली व्यक्त करते. उष्णता वाढत आहे. ही दुर्दैवी घटना घडली आहे. कार्यक्रम आयोजित करताना संवेदनशीलपणा दाखवावा. मुख्यमंत्र्यांनी ५लाखांची मदत जाहिर केली आहे. हे मी पाहिले आहे. मात्र एका माणसाची किंमत 5 लाख नसते. ज्याच्या घरातला विश्वासाचा, प्रेमाचा माणूस जातो त्यांचे दुःख हे पैशात मोजता येत नाही. याठिकाणी असंवेदनशीलता दिसून येते. कार्यक्रमाचा हेतू चांगला होता मात्र याला गालबोट लागले आहे. भाजपचे ईडी सरकार आधीपासूनच असंवेदनशील आहे. महाराष्ट्र ही दुर्दैवी घटना कधीच विसरणार नाही असे सुळे म्हणाल्या.