वाचनसंस्कृतीसाठी वाढविण्यासाठी पालिका आयुक्तांचा पुढाकार
ठाणे 01 : ठाणे शहराचा होत असलेला कायापालट हा शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकत असून शहर सुशोभिकरण, स्वच्छता याबरोबर सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम देखील महापालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू झाले आहेत. शहरात वाचनसंस्कृती फोफावावी यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी पाऊल उचलले असून सर्वप्रथम महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स यांच्यासाठी वाचनालय आकार घेत आहे.
महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी, रुग्ण विभागात आणि डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून लवकरच वाचनालय सुरू होणार आहे. या वाचनालयाचे काम युद्धपातळीवर सुरू असून या कामाचा आढावा सोमवारी झालेल्या पाहणीदौऱ्यात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर आदी उपस्थित होते.
दररोज दीड हजारांहून अधिक रूग्णांची ओपीडी तपासणी
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तळमजल्यावर दैनंदिन ओपीडी सुरू असते. सद्यस्थितीत ओपीडीची दररोजची संख्या ही साधारणपणे १७५० च्या घरात आहे. या रुग्णांचा नंबर येईपर्यत त्यांना थांबावे लागते. यासाठी तळमजल्यावर दोन ठिकाणी वाचन कोपरा असणार आहे. या ठिकाणी दैनिके, साप्ताहिके, मासिके तसेच सर्व भाषांमधील वृत्तपत्रांचा समावेश असणार आहे. तर एका ठिकाणी सामाजिक, आरोग्य संबंधित पुस्तके ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
रुग्णालयात काही रुग्ण हे उपचारासाठी किमान आठ ते दहा दिवस दाखल असतात. अशा रुग्णांसाठी विभागातच वाचन कोपरा असणार आहे. पुस्तकांच्या निवडीमध्ये बहुभाषिक, सकारात्मक विचार प्रसार करणारी, विनोदी पुस्तके, आरोग्याची काळजी कशी घ्यावी आदी माहितीपर पुस्तके ठेवली जाणार आहेत. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना काही काळ का होईना पुस्तके वाचावीशी वाटतील व त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. रुग्णालयात असेपर्यत त्यांचा वेळ तर सत्कारणी लागेल पण सवयीमुळे त्यांना भविष्यात देखील वाचनाची आवड निर्माण होईल असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी देखील स्वतंत्र वाचनकोपरा तयार करण्यात येत आहे.
लक्षवेधी व आकर्षक मांडणी
तळमजल्यावर दोन ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या वाचनालयाच्या जागेची पाहणी सोमवारी आयुक्तांनी केली. यावेळी निश्चित करण्यात आलेल्या जागेच्या ठिकाणी नेहमी पाहण्यात येते असे ठराविक पध्दतीचे वाचनालय न करता आकर्षक रंगरंगोटी, वाचकांना आकर्षित करेल अशा पध्दतीने पुस्तकांचे कप्पे, वाचकांना प्रेरणा देणारी वचने सुलेखन पध्दतीत असाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यातील पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचून झाल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी ठेवले जावे यासाठी सूचना फलक लावले जाणार आहे
नवीन लेबर वॉर्डची पाहणी
रुग्णालयात नव्याने लेबर वॉर्ड व ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले असून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा हा विभाग आहे, याची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली. सद्यस्थितीत अतिदक्षता विभागात 32 खाटा असून त्याची क्षमता वाढविण्यात यावी अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या. तसेच आवश्यक असलेला वैद्यकीय कर्मचारी वर्ग ही उपलब्ध करुन लवकरच हा नवीन लेबर वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे.
वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल लायब्ररी
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महानगरपालिकेचे स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय असणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून रुग्णसेवा अधिक बळकट करण्याकडे महानगरपालिकेचा भर आहे. त्याचवेळी या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न केला जावा अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी यावेळी दिल्या. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल लायब्ररी उपलब्ध करावी, जेणेकरुन एका क्लिकवर विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या पुस्तकांचे संदर्भ उपलब्ध होतील असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
शौचालय होणार अद्ययावत
ठाणे महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावर शौचालयाचे अद्ययावत असे नुतनीकरण करण्यात आले आहे, त्याच पार्श्वभूमीवर रुग्णालयातील शौचालये ही टप्प्याटप्याने नुतनीकृत करण्यात यावी असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.