रायगड : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच दरड कोसळल्याने अख्ख गाव दरड खाली दबला गेला. या दुर्घटनेत आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर दरडीखाली ५० ते ६० घरे आणि तब्बल १०० ते १२० लोक ढिगा-याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत २५ लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. ही घटना काल (बुधवार, १९ जुलै) रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या दुर्घटनेने माळीण दरड दुर्घटनेच्या भयंकर आठवणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

मुसळधार पाऊस, रात्रीचा अधार, निसरडी जमीन यासारख्या कारणांमुळे जेसीबी, पोकलेन नेण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे केवळ मनुष्यबळाच्या आधारेच सध्या बचावकार्य सुरु आहे. अनेक अडचणींचे डोंगर फोडत, अडथळे पार करत बचावकार्य केले जात आहे. डोंगर उतरुन येण्यास एक ते दीड तासाचा अवधी लागत असल्याने जखमींना खाली आणण्यास विलंब होत असल्याचाही दावा केला जात आहे.

एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. या गावात सुमारे ४० घरे असून ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली. प्राथमिक माहितीनुसार ही ६५ घरांची वस्ती असून त्यातील जवळपास २५ ते ३० घरांवर दरड कोसळली असून जमीन उद्ध्वस्त झाली आहे. एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. तर दुर्दैवाने सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच सकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. शिंदे यांनी इर्शाळवाडीतील परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच संबंधितांना बचावकार्याबाबत सूचनाही केल्या. “राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यकता भासेल तिथे लोकांना हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे. ज्या ज्या ठिकाणी पूराचा धोका आहे, तिथे एनडीआरफ तैनात करण्यात आलेलं आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षात

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांचे ट्विट

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!