नागपूर, दि. १३ : गडचिरोली आणि बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसूतीदरम्यान झालेल्या महिलांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीचा चौकशी अहवाल १५ दिवसात मागवून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
यासंदर्भात सदस्य सर्वश्री सुभाष धोटे, योगेश सागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की, गडचिरोली येथील घटनेप्रकरणी गठित करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या विभागीय चौकशी समितीच्या अहवालानुसार महिलेचा मृत्यू जंतुसंसर्गमुळे झाल्याचे दिसून येते. यात डॉक्टर व कर्मचारी दोषी आढळल्याचे चौकशी अहवालात दिसून येत नाही.
बुलढाणा येथील विद्या नीलेश गावंडे या महिलेस ११ ऑगस्ट रोजी स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तातडीने तपासण्या करून उपचार करण्यात आले. माता ही तपासणी दरम्यान डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आली. तिच्या प्लेटलेट कमी होत असल्याने आणि बाळाचा गर्भाशयात मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने व मातेची स्थिती गंभीर असल्याने तिला त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे संदर्भित करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मातेची स्थिती गंभीर झाल्याने त्याच दिवशी रात्री वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तथापि, प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपसंचालक आणि वैद्यकीय अधिष्ठाता, अकोला यांच्या अहवालानुसार मातेस योग्य ते उपचार दिल्याचे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी उत्तरात स्पष्ट केले.
गडचिरोलीत 200 खाटांचे स्त्री रुग्णालय गडचिरोली हा आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी समाजातील महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी गडचिरोलीत २०० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू करण्याची घोषणा आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सभागृहात केली.
आयसीयूबाबत जिल्हानिहाय बैठक घेणार
जिल्हा रुग्णालयातील आयसीयूबाबत जिल्हानिहाय बैठक घेण्यात येईल. या बैठकीत रुग्णालयातील यंत्रसामग्रीचा आढावा घेतला जाईल, असे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी शासनाने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करावा, असे निर्देश दिले. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, सदस्य सर्वश्री नाना पटोले, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, प्रा. वर्षा गायकवाड यांनी चर्चेत सहभाग घेत उप प्रश्न उपस्थित केले.
——–