नागपर, दि १३ : मॉरिशस आणि महाराष्ट्रातील संस्कृतीत साम्य आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्त्रोत आहे. मॉरिशसमधील मराठी मंडळी फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. मॉरिशसमधील बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशस आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक, कला क्षेत्रातील संबंध आणखी दृढ होतील असे प्रतिपादन मॉरिशसचे मंत्री ॲलन गानू, यांनी विधानभवात निधी वितरण सोळयात केले.

विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी मॉरिशस येथे बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारण्याकरीता आठ कोटी रुपयांचा निधी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते.

गाणू पुढे म्हणाले की, मॉरिशसमध्ये गणेशोत्सव, शिवजयंतीसह विविध सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मॉरिशसमधील बहुउद्देशीय पर्यटन संकुल वेळेत पूर्ण होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. महाराष्ट्रातून मॉरिशसमध्ये येणाऱ्या पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची जगात नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाबरोबर पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होत आहे. मॉरिशसमध्ये उभारण्यात येणाऱ्या पर्यटन संकुलामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रातील विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांसह ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थळांची माहिती होईल. यापुढेही मॉरिशसला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मॉरिशसबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील आणि मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

 उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत आणि मराठी संस्कृतीची जोपासना करणारा सुंदर असा मॉरिशस हा देश आहे. तेथे महाराष्ट्रातील संस्कृती रुजली आहे. मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना बहुउद्देशीय पर्यटन संकुलाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार या संकुलासाठी ८ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. मॉरिशस हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा देश आहे. या संकुलामुळे राज्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *