कल्याण : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. जोरदार पडणाऱ्या पावसाचा मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान ४ महिन्यांचं बाळ वाहून गेल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.
पावसामुळे सीएसएमटीहून अंबरनाथ येथे जाणारी लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांदरम्यान सुमारे २ तास उभी होता. मात्र लोकल बराच वेळ थांबल्यामुळे अनेकजणांनी खाली उतरून कल्याणच्या दिशेने पायी जाण्याचा निर्णय घेतला. त्यात एका चार महिन्यांच्या छोट्या बाळाला घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई देखील चालत होते. दरम्यान रेल्वे रुळावरुन नाल्यावरचा पूल ओलांडत असताना अचानक त्या काकांच्या हातात असलेले चार महिन्यांचं बाळ हातातून निसटलं आणि वाहत्या पाण्यात पडलं. दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी ही घटना घडली. घटनेनंतर बाळाच्या आईने रेल्वे ट्रॅकवरच टाहो फोडला. आपलं बाळ डोळ्यांदेखत पाण्यात वाहून गेल्याने आईने हंबरडा फोडला. ती प्रचंड आक्रोश करत होती. ती लेकरासाठी त्या नालाजवळ धावत जात होती. यावेळी तिथे असलेल्या इतर प्रवाशांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला तिथे थांबवलं. पण या दुर्देवी घटनेमुळे घटनास्थळी असलेल्या प्रवाशांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. रेल्वेतील एका प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलासह कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या वाहत्या पाण्यात हे बाळ पडलं तिथे अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध मोहिम सुरु आहे.
बाळ सापडल्याची चुकीची माहिती, प्रशासनाचा खुलासा
ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली होती. या लोकमधून उतरून एक महिला व एक व्यक्ति सहा महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. त्या व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने ते बाळ वाहून गेले.
बाळाचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. रात्री त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम पोचली होती. मात्र अंधार असल्याने शोध कार्य पूर्ण होऊ शकले नाही. पाण्यात पडलेले बाळ अद्याप सापडू शकले नाही. यासंबंधात बाळ सापडल्याची चुकीची माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. ठाणे जिल्हा प्रशासनास मिळालेल्या माहितीनुसार अद्याप वाहून गेलेल्या बाळाचा तपास लागलेला नाही असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.