मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधानसभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार यावर चर्चा झाली यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
छगन भुजबळ म्हणाले की, “कुसुमाग्रजांची आज जयंती आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेल्या १४ वर्षापासून आपण प्रयत्न करत आहे. अभिजात दर्जा मिळवण्यासाठी गरजेचे असणारे चारही निकष आपली मराठी भाषा पूर्ण करते. असे असताना देखील अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
“त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह प्रधानमंत्र्यांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विधानभवनातून / संतोष गायकवाड